सामाजिक

अडचणीच्या काळातील गावबंदी..

माझ्या फेसबुक वरील एका पोस्ट वरून प्रेरित..
आज पुणे, मुंबई सारखी मोठी शहरे कोरोना या जीवघेण्या आजाराचा सामना करीत आहे आणि विशेषतः पुणे येथील रुग्ण संख्या थोडी अधिक असल्याने हे शहर संकटात सापडले आहे.ज्या पुण्याने पुणे जिल्हा आणि अन्य महाराष्ट्रातील अनेक बेरोजगारांना रोजगार दिला, ज्या पुणेकरांनी तुमच्या सारख्या असंख्य लोकांना आधार दिला, तसेच विद्यमान शहराच्या सर्व सोयी स्वतः पुरत्या मुबलक असताना देखील अश्या असंख्य ठिकाणाहून आलेल्या लोकांच्या लोंढ्यासाठी स्वतःची गैरसोय होत असताना सर्वांना सामावून घेतले त्यांना अश्या अडचणीच्या काळात जी वागणूक मिळत आहे ती दुर्दैवी आणि अमानवीय आहे. पुणेकरांच्या धैर्याला, सहनशीलतेला, सहिष्णुतेला तोड नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे शहर पुन्हा जिद्दीने उभे देखील राहिल पण मग नंतर सर्व स्थिर झाल्यावर पुण्यात याल तेव्हा आम्ही तुमचे स्वागत करावे अशी अपेक्षा तुम्ही धरू नका. कारण आज पुणेकरांना गावबंदी करून तुम्ही तुमची विचित्र मानसिकता दाखविली आहे. आज पुणेकरांना खरी गरज आहे धीर देण्याची त्यांच्या पाठमागे खंबीरपणे उभे राहण्याची पण दुर्दैवाने चित्र तसे दिसत नाही त्यांना थेट गाव बंद केले गेले. या लोकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे आपत्तीच्या काळात याच शहराने आपला गाववाला म्हणून आपणांस सर्वतोपरी मदत केली आहे. त्यात कोणताही अभिनिवेश नाही , ती केलीच पाहिजे पण तेव्हा पुणेकरांनी असा विचार केला असता की या आपत्तीच्या प्रसंगी यांना आम्ही का मदत करावी तर यांना कसे वाटले असते. पण आम्ही पुणेकर त्यावेळी आपल्याशी असे वागलो नाही आणि वागणार देखील नाही. त्यामुळे तमाम गाववाल्यांनो पुणेकरांना गावबंदी करू नका ही कळकळीची विनंती.
आता तर कर्फ्यु आहे त्यामुळे सर्वच बंद आहे पण त्यापूर्वी तुम्ही जे वागलात ते नैतिक नक्कीच नव्हते. आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री ओरडून सांगत आहेत की कोणीही गावबंदी करू नका पण दुर्दैवाने अनेक गावांच्या वेशीवर आणि बाहेरून येणारे रस्ते बाजूच्या मोठ्या शहरातून येणाऱ्या नागरिकांसाठी कर्फ्युच्या आधीच बंद केले गेले हे दुर्दैव.

आपण दिलेल्या वागणुकीने आम्हा तमाम पुणेकरांना मात्र खूप दुःख झालं हे मात्र नक्की.

मी पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर आणि त्या तमाम शहराचा प्रतिनिधी आहे जिथे कोरोना चा प्रादुर्भाव झाला आहे व आजूबाजूचे गावातील लोक त्यांना त्यांच्या गावात येण्यास प्रवेश बंदी करत आहेत. …..!

सह्रदयी…
#मी पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर आणि त्या तमाम शहराचा प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *