रायरेश्वर अस्वलखिंड तंगडतोड ट्रेक…
नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा बॅंकेला सलग तीन सुट्ट्या म्हणून हि मोहीम आखली गेली.
२३ तारखेला दुपारी साडेतीन वाजता पुण्याहून रायरेश्वरकडे प्रवास सुरू झाला सुमारे साडेपाच वाजता आंबवडे येथे गाडी थांबली हिरडस मावळातील हिरवाईने नटलेले हे गाव म्हणजे एक प्रेक्षणीय स्थळ आहे तेथील पंतसचिवांनी बांधलेला झुलता पुल आणि शिल्पकलेने नटलेले पश्चिमाभिमुख नागेश्वर मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचे दोन वेगवेगळ्या शतकातील पण अदभुत नमुने आहेत हि सर्व कला कॅमेर्यात टिपून गाडीत बसलो आणि रायरेश्वरकडे पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला साडेसहा वाजता श्वानदराजवळ गाडी आम्हाला सोडून गेली आणि ट्रेकला सुरवात झाली.
बॅटरीच्या उजेडात एक लांबलचक शिडी चढून आम्ही पठारावर दाखल झालो आणि पुढे अर्ध्यातासातच रायरेश्वर मंदिराजवळ पोहोचलो हेच ते मंदिर
भावना उफाळून आणणारा . छाती अभिमानाने फुगवणारा . त्याच बरोबर डोळ्यात आनंदाचे अश्रू आणणारा इतिहासाचा साक्षीदार म्हणजे ” रायरेश्वर”
येथेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी जुलमी सत्तेविरुद्ध स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली
सर्वांनी रायरेश्वराचे दर्शन घेतले नुकतीच संध्याकाळची महादेव पुजा झाली होती साखरभाताचा प्रसाद घेऊन सर्वजण मंदिराजवळील होळीच्या माळावरील बाकड्यावर गप्पा मारत बसलो.
तीथेच माळाच्या मध्यभागी पडलेल्या दगडी गोट्याकडे आम्ही मोर्चा वळवला, मग प्रथम मी तो वजनदार गोटा उचलून मानेभोवती फिरवून मागे टाकला, पाठोपाठ निलेश वाघ आणि विकास गाडे यांनी सुद्धा शक्तीप्रदर्शनाचा खेळ केला. त्यानंतर तो गोटा उचलण्याची पद्धत व शास्त्र यावर मी थोडे माझे ज्ञान व्यक्त केले.मग मस्त गप्पा मारत गोपाळ जंगम यांच्या घराकडे जेवणासाठी निघालो. ठरल्याप्रमाणे स्वयंपाक तयारच होता गरमागरम पिठलं भाकरी खर्डा लोणचं पापड भात वरण यावर मस्त ताव मारुन भरपेट जेवण केले .बाहेर थंडी खुप असल्या कारणाने त्यांच्या घरातच आम्ही सर्वजण झोपलो.
२४ तारखेला सर्वजण सकाळी पाच वाजताच उठले आवराआवर केली खमंग पोहे आणि चहा अशी न्याहारी करून बाहेर पडलो.
ठरल्याप्रमाणे दोन वाटाडे घेऊन ( गणेश आणि अंकुश धनावळे)सकाळी साडेसात वाजता अस्वलखिंडीकडे पायी प्रवास सुरू झाला.
रायरेश्वराचे विस्तीर्ण पठार डावीकडे केजळगड, पांडवगड, कमळगड, कोळेश्र्वर पठार आणि महाबळेश्वर पठार सह्याद्रीचे हे मनमोहक दृश्य पाहत हिरडा, जांभूळ, उंबर, नेचा, कार्वी अशा अनेक रानटी झाडांनी समृद्ध असलेले रायरेश्वराचे आठ एक किलोमीटरचे ( पाच तासांचे अंतर) पठार कधी संपले कळलच नाही मग अस्वलखिंडीच्या कड्यावर आल्यावर कळलं की वरवर साधा वाटणारा हा ट्रेक नसुन एक आव्हानच आहे.खोल खोल दऱ्या अजस्र कडे यातुन पायवाट आहे की नाही ही शंका पण यातूनच वाटाडे मार्ग काढत राहिले आणि आम्ही त्यांच्या मागे.
तीव्र उतार सुकलेले गवत यावर पायच थांबत नव्हता
असाच अवघड मार्ग कधी बसुन तर कधी बुड घासत पडत धडत पाच वाजता अस्वलखिंडीत पोहोचलो आणि सर्वांनी मिळून एकच जल्लोष केला
“हर हर महादेव”
” छत्रपती शिवाजी महाराज की जय”
एवढी अवघड वाट आम्ही उतरलो यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.
अस्वलखिंडीत बरोबर असलेली शिदोरी खाल्ली आणि कुडली गावाच्या दिशेने निघालो सहा वाजताच अंधार पडला बॅटरीच्या उजेडात सात वाजता कुडली गावात पोटे मामांच्या घराजवळ पोहोचलो. त्यांनी आपुलकीने आम्हाला फक्कड चहा बनवून दिला.
अकरा/ साडे अकरा तासांची तंगडतोड करून सह्याद्रीतील एक अवघड मोहीम फत्ते झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर होता.
ह्या ट्रेकमध्ये एक सत्तरीतला जवान चव्हाण मामा पण सामील होते. त्यांचे कौतुक तर आहेच पण ही कामगिरी पहाता त्यांचा सत्कारच करायला हवा.
ह्या सह्याद्रीतुन पुन्हा एकदा भरमसाठ आत्मविश्वास घेऊन आम्ही बसमध्ये बसलो आणि पुण्याकडे परतलो.
मोहीमेतील भिडू
मी ( गिरीष भवाळकर) , रसिक जगताप, दिनेश मुकनाक, चव्हाण मामा, नंदकुमार पडवळ, आशुतोष पाटणकर, निलेश वाघ, मंगेश नानजकर आणि आमच्या ग्रुपचे मुख्य मार्गदर्शक ज्यांना आम्ही मेजर जी ( लष्करातील नव्हे ) असे संबोधतो ते विकास गाड









