सामाजिक……. जग- महामारीनंतरचे
कोरोना महामारी चा उद्रेक आता चरण सीमेवर आहे. सरकार, डॉक्टर ,नर्सेस, स्वच्छता दूत, पोलीस खाते, आरोग्य विभाग ,बँकिंग क्षेत्र आणि सर्व स्वयंसेवी संस्था हे आपल्यासाठी,आपल्या परिवारासाठी पर्यायाने समाज आणि देशासाठी आपला जीव धोक्यात घालून या आजाराला हद्दपार करण्यासाठी आपापल्या स्तरावर अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांचे मनःपूर्वक आभार. बहुतांशी लोक आपापल्या घरी बसून या प्रयत्नांना बळ देत आहेत. हे सर्व या पिढीसाठी नवीन आहे. एखादा अदृश्य विषाणू येतो काय आणि आपलं सर्व जगणं थांबवतो काय. शेवटी गदिमांच्या “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…दोष ना कुणाचा” या ओळी सत्यच ठरल्या आहेत.
पण सर्व विषयाला अंत आहे. येत्या काही काळात हे महामारीचे प्रमाण हळूहळू कमी होईल व सर्व व्यवहार पुनश्च चालू होतील. आता तर या आजारावर लस देखील आली आहे. आज बाहेर पशु-पक्षी चांगले वातावरण असल्याने मस्त विहार करीत आहे आणि माणूस मात्र घरात मास्क लावून हिंडतो आहे या पेक्षा दुर्दैव ते कोणते.
पण हे देखील खर आहे की यातून काही चांगल्या गोष्टी, ज्या आपण ठरवून देखील करू शकलो नसतो त्या आपसूक होत आहेत व त्याचे श्रेय कोरोनाला जाते. माणूस घरात बसून राहिल्याने गंगा प्रदूषण 50% ने कमी झाले आहे. पृथ्वीवरील ओझोनचा थर /प्रदूषण खूपच कमी झाल्याने बळकट झाला आहे. शहरांमधील सर्व प्रकारचे प्रदूषण कमी झाले आहे. कुटुंब संस्था आणि आपल्या माणसाला वेळ देणे याचे महत्व कळले आहे. सर्व मानापमान, जात-पात-धर्म, मोठा-लहान, गरीब- श्रीमंत सगळे अभिनिवेश गळून पडले. निसर्गाने स्वतः स्वतःचा मार्ग शोधला.जालंधर मधून हिमालय दिसतो का नाही माहीत नाही पण शेजार कळला, शेजारधर्म कळला. खर्च मर्यादित झाले, गरजा आपोआप कमी झाल्या. आपण या जागतीक आपत्तीला इष्टापत्ती समजून आता अधिक प्रगल्भतेने, सजगतेने पुढील वाटचाल केल्यास ही वसुधा अधिक बहरून येईल यात शंकाच नाही.
पण खरी कसोटी पुढेच आहे. यानंतर सर्व क्षेत्रातील प्रचंड मंदी आणि आर्थिक संकट सर्व जगासमोर पर्यायाने भारतासमोर देखील उभे राहिले आहे. आधीच बेरोजगारांच्या झुंडी रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत ज्यांच्या हातात थोडाफार रोज पडत होता तोही आता बंद झाला आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. रोजगारासाठी स्थलांतर करून जवळच्या शहरात/ राज्यात आलेले कामगार lockdown च्या भीतीने पुन्हा गावाकडे चालले आहेत ते लवकर परतण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार संधी मिळेल पण ते काम करण्याची मानसिकता त्यांच्यात असेल का हाच खरा प्रश्न आहे. आता शासनाने/स्वयंसेवी संस्था यांनी या वेगवेगळ्या क्षेत्रांतील रोजगार संधी शोधून तेथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला तर मग थोडा सकारात्मक बदल घडेल पण ते नियोजन, धोरण तात्पुरते न रहाता दीर्घकाळ स्वीकारले तर हा प्रश्न सुटू शकतो.या काळात अनेक कंपन्यांना/व्यवसायिकांना प्रचंड तोटा झाला आहे. एकतर उत्पादन बंद आणि राष्ट्रीय आपत्ती त्यामुळे कामगारांना वेतन देणे आवश्यक अश्या दुहेरी कात्रीत व्यावसायिक अडकले आहेत. दुसरीकडे व्यापारी वर्ग सुद्धा जागा भाडे, कामगारांचा पगार पडून असलेला दुकानातील माल अश्या मोठ्या आर्थिक संकटात आहे.
त्यामुळे येणाऱ्या पुढील किमान दोन वर्षांच्या काळात कमी किंवा आहे त्याच वेतनात अधिक काम ही पद्धत रूढ होण्याची शक्यता आहे नव्हे ती गरज आहे.
चीन मधील वुहान शहर आता अगदी सर्वांच्या (कु)परिचित झालं आहे. हेच शहर चीनमधील मोठी बाजारपेठ समजली जाते. पण या महामारीच्या काळातील चीनची भूमिका अनेकार्थाने अपारदर्शी आणि संशयाची राहिली आहे त्याचे खरेखोटेपण यथावकाश बाहेर येईलच पण त्यामुळे अनेक देशांनी तेथून आपला काढता पाय घेतला आहे. सुरवात जपानने केली आहेच आता द.कोरिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फ्रान्स असे अनेक देश देखील पुढे येतील व चीनमधून आपली गुंतवणूक हळूहळू कमी करतील. नुकत्याच कळलेल्या माहितीनुसार ही संधी घेत केंद्रातील मोदीं सरकारने या देशांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रण दिले आहे. याचाच अर्थ जर या कंपन्या भारतात आल्या तर येथील नवरोजगार वाढतील. या बरोबरीने आता देशांतर्गत स्वदेशी उत्पादन सुरुवात करण्यास एक चांगली संधी आहे. Make in India, Skil Development, Start up या योजना आता अधिक खोलवर पोहचवून त्यातून नवव्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे , त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पादनासाठी स्थानिक बाजारपेठ विकसित करणे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्यास चांगले व्यवसायिक वातावरण तयार होईल.
शैक्षणिक क्षेत्राला या महामारीचा मोठा फटका बसला आहे. वर्षभर अभ्यास करून जर परीक्षा देता आली नाही तर पुढील वर्षात अभ्यासाचा ताण पडतो. पण आता नव्याने काही तयारी करावी लागणार आहे.पहिला प्रश्न फी चा असणार आहे. बिकट आर्थिक परिस्थिती आणि महामारीचे बळी ठरलेल्यांना शिक्षण शुल्क वगळता अन्य विषयांची फी माफी करावी लागेल. हुशार विद्यार्थ्यांना जशी शिष्यवृत्ती असते तशी व्यवस्था या विद्यार्थ्यांना किमान पुढील शैक्षणिक वर्षासाठी केली पाहिजे. सरकार हे करेलच पण बड्या शिक्षण संस्थांनी या विषयात पुढाकार घेणे गरजेचे आहे. विद्यपीठांनी सुद्धा आपल्या बजेटमध्ये यासाठी विशेष तरतूद केली पाहिजे.त्यांनी अन्य तरतुदी कमी करून तसेच वेळ प्रसंगी त्यांचा आपत्कालीन निधी, गरजू तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या किमान शैक्षणिक गरजांसाठी वापरल्यास त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच रखडलेल्या परीक्षांचे नियोजन, पेपर तपासणी, निकाल जाहीर करणे, नंतरचे शैक्षणिक प्रवेश, अशी असंख्य आव्हाने आहेत त्यातून मार्ग काढणे आणि व्यवस्था प्रवाहित करणे आवश्यक आहे.
सततच्या lockdown च्या भीतीने आणि त्यामुळे घरात बसून रहावे लागत असल्याने आता जनता पुरती कंटाळलेली आहे पण ही चेन ब्रेक करण्यासाठी त्याशिवाय अन्य पर्याय सरकारकडे बहुतेक नाही हेही वास्तव्य आहे. सधन कुटुंबातील लोक सध्या सोशल मीडियावर वेगवेगळी challenges घेत आहेत, आता मायबाप शासनाने महसूल गरजेपोटी मद्यविक्रीला परवानगी दिली आहे, त्यामुळे नोटबंदीच्या काळातील रांगेची आठवण झाली फरक एकच पण दखल घ्यावा असा म्हणजे मीडियाने नोटा बदलण्यासाठी रांगेतील लोक कसे नोव्हेंबरमधील थंडीच्या काळात देखील चक्कर येऊन पडत आहेत हे विस्तृतपणे दाखवले आणि आता भर उन्हाळ्यात या मद्यासाठीच्या रांगेत एकाला सुद्धा असे काही झालं नाही किंवा अशी कुठे बातमी नाही हे विशेष.असो. पण अनेक जण असेही आहेत जे वर म्हणल्याप्रमाणे दोन वेळच्या अन्नासाठी महाग झाले आहेत.ज्यांचे पोट रोजच्या मेहनतीने आणि मिळणाऱ्या पैशात चालते, जे वृद्ध निराधार आहेत, अंध-अपंग आहेत यांचे हाल होत आहेत. राज्यातील तसेच परराज्यातील ज्यांचे हातावरचे पोट आहे, ज्यांच्या खिशात दमडी नाही ,बाहेर रोजगार नाही आणि घरात त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब लहान मुलं दिनवाणे, उदास आणि हताश बसले आहेत अशांच्या समस्यांना तर पारावार नाही.अश्या वेळी त्यांच्यासाठी सरकार त्यांच्यापरीने सोय करत आहेच त्याबरोबरीने ज्या स्वयंसेवी संस्था राबत आहेत त्यांना, ज्यांची आर्थिक मदत करण्याची क्षमता आहे त्यांनी मदत करणे हे देखील आवश्यक आहे.
येणारा काळ अत्यंत कठीण पण काही सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा आहे फक्त गरज आहे आपण त्यासाठी किती तयार आहोत याची खात्री करण्याची. ही संधी आहे ज्यातून आपण देशाची, समाजाची, स्वतःची उन्नती करण्याची.
चला तर उद्याच्या प्रखर पण उज्वल प्रकाशवाटेने जाण्यासाठी आजच तयार राहू कारण लवकरच सुंदर पहाट होणार आहे. तोपर्यंत “सारे भारतीय माझे बांधव आहेत” या उक्तीप्रमाणे आपल्यातले माणूसपण जपत येणाऱ्या आव्हानांना एकत्रपणे सामोरे जाऊ.
सरतेशेवटी उबंटू या चित्रपटातील तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या प्रार्थनेच्या दोन ओळींची आठवण झाली
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
गीतकार :- समीर सामंत.
सुंदर शब्द आश्वासक पहाट.
गिरीष भवाळकर.
पुणे

